नियतीने रडवलेला आणि कलेने हसवलेला जगप्रसिद्ध चित्रकार - रत्नदीप बारबोले
माढा तालुक्यातील सीना दारफळ हे एक गाव..आणि त्या गावातील बळीराम बारबोले हा अशिक्षीत पण जिद्दी माणूस! शेतीत काही नाही,नोकरीच महत्त्वाची असे त्यांचे विचार...! स्वतः अडाणी असुनही धाकट्या भावाला शिकवून नोकरी लावायची ही त्यांची जिद्द.आणि त्यासाठी त्यांनी स्वतः काबाडकष्ट करुन भावाला इंजिनियर बनवले.आता आपल्याला सुखाचे दिवस येतील असे वाटत असतानाच जे प्रत्येक घरात घडते तेच त्याही घरात घडले.हात पोहोचल्यानंतर आपल्यासाठी कुणी किती खस्ता खाल्ल्या हे माणसाला आठवत नाही.ते घरही याला अपवाद नव्हते.
असा हा दुखावलेला आणि मनात काही ठरवून पुन्हा जिद्दीला पेटलेला माणूस.पत्नी सुमन, कुसूम व दैवशाला या मुली आणि मुलगा रत्नदीप असे त्यांचे पंचकोनी कुटूंब...
![]() |
| रत्नदीप यांची आई सुमन व वडील बळीराम बारबोले |
रत्नदीप यांचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच झाले.स्वराज्याचे स्वप्न पाहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण सचित्र इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकात होता.छत्रपतींच्या कार्याची आणि पुस्तकातील त्या रंगीत चित्रांची भूरळ चौथीत शिकणाऱ्या रत्नदीप यांना पडली.आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने रत्नदीप यांनी चित्रकलेचे तोरण बांधले.सुरुवात अर्थात पेन्सिल स्केचनेच झाली.ती पण शिशाची पेन्सिल नव्हे तर पाटीवर लिहायची पेन्सिल.पहिले चित्र अर्थातच पाटीवरच रेखाटले गेले.पहिल्या चित्राचे कौतुक वर्गशिक्षकांनी तर केलेच पण घरातीलही सर्वांनी केले.त्यामुळे आकाश ठेंगणे झाले नाही तरच नवल!
नवभारत माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक मधूकर कांबळे यांचे घर रत्नदीप यांच्या घराशेजारीच होते.आपण काहीतरी वेगळे केले आहे आणि सर्वजण त्याचे कौतूकही करत आहेत या आनंदातिशयातून रत्नदीप यांनी ते चित्र कांबळे सरांना दाखवले.हिऱ्याची पारख रत्नपारखीच करु शकतो.त्याप्रमाणेच रत्नदीप यांच्या बोटातील जादूची परख कांबळे सरांना लगेचच आली.त्यांनी रत्नदीप यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.
![]() |
| ज्यांनी रत्नदीप यांना घडवले ते मधूकर कांबळे सर व रत्नदीप |
चौथीनंतर पाचवीला ते नवभारत विद्यालयात गेले.तिथे ते कांबळे सरांचे विद्यार्थी झाले.पाटीचे शिक्षण संपून आता वही व पेनचे शिक्षण सुरु झाले होते.आई वडील शेतमजूरी करुन शालेय साहित्य पुरवत होते पण चित्रकलेचा छंद जोपासण्यासाठी लागणारे कलर व कागद यावर अतिरिक्त खर्च करण्याची त्यांची ऐपत नव्हती.पण शिष्यात जर उज्ज्वल भविष्य दिसत असेल तर कोणताही गुरु पदरखर्च करुन उत्तम शिष्य घडवायला मागेपुढे पाहत नाही.कांबळे सरांनीही तेच केले.चित्रकलेसाठी लागणारे सर्व साहित्य सरांनी स्वतः विकत घेऊन रत्नदीपला दिले.आणि पाटीवरची कला कागदावर बहरु लागली.
चित्रकलेच्या ज्या परिक्षेला इतर विद्यार्थी साधारणपणे नववी दहावीला असताना बसतात त्या इलिमेंट्री परिक्षेला रत्नदीप सहावीला असताना बसले आणि पासही झाले.सातवीत ते चित्रकलेची इंटरमिजीएट ग्रेड परिक्षा पास झाले.याच कालावधीत कुर्डूवाडीच्या नुतन हायस्कूलमध्ये एक चित्रकला स्पर्धा भरवली गेली होती.या स्पर्धेत तीस स्पर्धक सहभागी झाले होते.त्या स्पर्धेत रत्नदीप यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
नववीत गेल्यानंतर कांबळे सरांनी रत्नदीपच्या हाती कॅनव्हॉस व अॉईल कलर सोपवला.तो ही खर्च अर्थातच कांबळे सरांनीच उचलला.
" भले माझी पेंटिंग लाखात विकली गेली असतील पण भावनिक नात्यात पैसा महत्त्वाचा नसतो.एकजणाला त्याच्या मुलीचे पोट्रेट बनवून हवे होते.मी ते बनवून दिले पण एक रुपयाही घेतला नाही.कारण ते पोट्रेट हे जग सोडून गेलेल्या त्याच्या छोट्या मुलीचे होते.त्यांचे आणि माझे दुःख सारखेच होते.भावनिक नात्याचा एक धागा आम्हा दोघांमध्ये जोडला गेलेला होता.मी त्यांच्याकडून कसे पैसे घेऊ शकत होतो? " - रत्नदीप बारबोले
एकीकडे चित्रकला क्षेत्रात प्रगती होत असताना दुसरीकडे अभ्यासात मात्र रत्नदीप यांची वाटचाल यथातथाच होती.भूतकाळात दुखावले गेलेल्या आणि भविष्याची मनात काहीतरी खुणगाठ बांधलेल्या एका जिद्दी बापाला ही गोष्ट नक्कीच खटकणारी होती.दहावी बारावी चांगल्या मार्कांनी पास होऊन रत्नदीप यांनी कमीत कमी शिक्षक तरी व्हावे अशी त्यांची इच्छा होती.पण मुलगा अभ्यासात न रमता चित्रात रमतोय हे पाहून त्यांनी रत्नदीप यांची कानउघडणीही केली.कलेने झपाटलेली माणसे अशा कानउघडणीने थोडीच सुधारणार असतात!
नेहमी ५०-६० टक्क्यांवर रेंगाळणाऱ्या या गाडीने याच गतीने दहावी व बारावीची स्टेशने पार केली.आता पुढे काय?
एवढ्या मार्कांवर डी.एड.ला प्रवेश मिळणार नव्हता आणि डोनेशन भरुन प्रवेश घ्यायला घरची आर्थिक परिस्थिती नव्हती.कारण त्याच साली रत्नदीप यांची धाकटी बहीण दैवशाला यांचे लग्न झाले होते व त्या कर्जाचा डोंगर वडिलांच्या डोक्यावर होता.मग डोनेशनला कुठून आणणार पैसा? अशा रितीने एका जिद्दी बापाचे मुलाला शिक्षक करण्याचे स्वप्न असे भंगले होते.ते खूप निराश झाले होते पण कांबळे सरांनी त्यांची कशीतरी समजूत काढली व आर्ट टिचर डिप्लोमा ( A.T.D. ) करण्याचे ठरले.सोलापूरच्या शासकिय कुचन चित्रकला महाविद्यालयात अर्ज टाकला पण तिथला प्रवेश ५५ टक्केवर बंद झाला.५० टक्के मार्क असलेल्या रत्नदीप यांचा तो ही मार्ग बंद झाला.
पण जिथे कांबळे सर तिथे काहीतरी मार्ग असणारच...एका बापाची जशी जिद्द होती तशीच एका गुरुचीही जिद्द होती.रत्नदीपला ते आपल्या मुलासारखाच मानत होते.आता गुरु-शिष्य आणि बाप-मुलगा या दोन्ही भूमिका त्यांनाच पार पाडायच्या होत्या.वर्षाला दहा हजार असे दोन वर्षाचे वीस हजार डोनेशन कांबळे सरांनी स्वतःच्या खिशातील भरुन रत्नदीप यांना कुर्डूवाडीच्या रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला.
प्रवेश तर मिळाला पण सगळाच खर्च कांबळे सरांवर कसा टाकायचा? आधीच त्यांचे सहकार्य काय कमी होते काय? ही चुटपूट रत्नदीप यांच्या आईच्या मनाला सारखी लागून रहायची.मग आई घरचे करुन इतरांच्या शेतावर शेतमजूरी करायची.दारफळवरुनच एस.टी.ने जेवणाचा डबा पाठवायची.लागतील तसे डब्यातून पैसेही पाठवायची आणि शिलकीतून कांबळे सरांनी डोनेशनसाठी भरलेले पैसे थोडे थोडे करुन सरांना द्यायची.तिची खूप ओढाताण झाली या कालावधीत.
पण ती माऊली कायम आपल्या लेकराच्या पाठीमागे उभी राहिली.शिक्षण घेताना काय म्हणून खर्च नसतो? खोलीभाडे,कलर,कॅनव्हॉस,असाईनमेंट या सगळ्या खर्चाचा भार ती उचलायची.आणि याची जाणिव रत्नदीप यांना असल्याने त्यांनी कधीच थिल्लरपणा केला नाही.कसली मौजमजा केली नाही.सगळे लक्ष फक्त चित्रकलेवर केंद्रीत केले. या काळात त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य बी.टी.खाडे सर,वाळूजकर सर व धोत्रे मॅडम यांचे खूप सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.संस्थापक ढेकळे सर व त्यांच्या सुविद्य पत्नी ढेकळे मॅडम या दोघांनी तर अगदी जीवापाड जपले.कारण रत्नदीप यांच्यातील कलागूण त्यांनी उत्तम हेरले होते व हा पुढे जाऊन नाव कमवणार असा त्यांना विश्वास होता.
या भागात उन्हाळ्यात भयंकर उष्णता असते.घरुन आलेल्या डब्यातील भाजी दुपारीच खराब व्हायची.चपात्या कडक व्हायच्या.मग काय करायचे? एका ताटात पाणी घ्यायचे,त्यात कडक झालेली चपाती तुकडे करुन टाकायची,त्यावर गावाकडून आणलेली चटणी व मीठ टाकायचे आणि ते खायचे.असेही दिवस रत्नदीप यांनी काढलेले आहेत.या कठीण दिवसातला सुखद दिलासा म्हणजे ढेकळे मॅडम त्यांच्या घरी बनवलेली भाजी अधून मधून पाठवून द्यायच्या.
वडिलांचे स्वप्न,आईचे कष्ट,घरची परिस्थिती,कांबळे सरांच्या सहकार्याची जाणिव आणि चित्रकला महाविद्यालयाचे संस्थापक,प्राचार्य,इतर शिक्षक यांची त्यांच्याकडून असलेली अपेक्षा या सर्व गोष्टी समोर ठेऊन रत्नदीप यांनी चित्रकलेचा इतका सराव केला कि ते महाविद्यालयात पहिल्या श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर सुरु झाला नोकरीचा शोध ! वेळापूरजवळील उंबरे येथे त्यावेळी विनाअनुदान तत्त्वावर चालणारी एक आश्रमशाळा होती.तिथे कलाशिक्षकाची जागा भरणार असल्याचे समजताच रत्नदीप तिथे गेले.साडेतीन लाख डोनेशन भरले तर रुजू करुन घेण्यात येईल असे तिथे सांगण्यात आले.आता एवढी मोठी रक्कम कशी जमवायची याविषयी घरी खलबते सुरु झाली.माझा मुलगा जर आज माझ्या स्वप्नाप्रमाणे शिक्षक होणार असेल तर ही जमिन काय म्हणून ठेवायची असा निर्णय रत्नदीप यांच्या जिद्दी वडिलांनी घेतला.अडीच एकर जमिनीतील दीड एकर शेती विकायची व डोनेशन भरायचे असे ठरले.एखाद्या गरजूला जास्तीत जास्त कसे चिरडता येईल हे पाहणे आणि तसे करणे हीच तर व्यावहारिक जगाने फायद्याच्या व्यवहाराची व्याख्या ठरवलेली आहे.आज ज्या जमिनीची किंमत २५ लाख रुपये आहे तीच जमीन त्यावेळी फक्त साडेतीन लाखाला विकून डोनेशनचे साडेतीन लाख रुपये भरले गेले.
एका जिद्दी माणसाचा मुलगा अखेर शिक्षक झाला.पण पगारपाणी शून्य.श्रीपूरमध्ये असलेली धाकटी बहीण दैवशाला यांनी रत्नदीप यांना सांभाळण्याची जबाबदारी उचलली.श्रीपूरमध्ये रहायचे व उंबरे येथे मोटारसायकलने जायचे,यायचे.आणि पेट्रोलला पैसे कोण पोहोचवायचे? तर शेतमजूरी करणारी आई...एका शिक्षकासाठी ही गोष्ट किती लाजीरवाणी असेल हे फक्त रत्नदीपच सांगू शकतात.आज ना उद्या अनुदान मिळेल आणि पगार सुरु होईल या आशेवर सर्व काही सुरु होते.
पण दैवशाला जरी पाठीशी असली तरी दैवगती मात्र निराळीच होती.दोन वर्षाच्या आतच ती आश्रमशाळा बंद पडली आणि पुन्हा नियतीने एका जिद्दी बापाची क्रुर चेष्टा केली.यामुळे बळीराम बारबोले नावाचा पैलवानकी केलेला जिद्दी माणूस हताश,निराश झाला.
गावात कुजबूज सुरु झाली.जमिन विकून तरी काय फायदा झाला...पोराने बापाला गाळात घातले...पोराला पहिल्यापासूनच चित्रे काढायचा भिकार नाद...दुसरे काहीतरी शिकला असता तर कुठेही चिकटला असता...वगैरे वगैरे!
पण एका जिद्दी बापाच्या मनाला किती यातना झाल्या असतील? एक उत्तूंग स्वप्न पाहणाऱ्या रत्नदीप यांची मनस्थिती काय झाली असेल? याचा विचार करायला समाजाकडे फुरसत नव्हती.समाजाएकी फक्त चघळायला एक विषय मिळाला एवढेच महत्त्वाचे होते.
आला दिवस पाठीमागे ढकलत कसेतरी जगणे सुरु होते.पुन्हा नोकरी शोधणे गरजेचे होते.आणि रत्नदीप यांच्या प्रयत्नाला यश आले.माढा तालुक्यातील वडशिंगे येथील डी.एड.कॉलेजमध्ये त्यांना कलाशिक्षकाची नोकरी मिळाली.महिना दोन हजार रुपये पगार सुरु झाला.त्यातले दीड हजार रुपये पेट्रोलखर्चालाच जायचे हा भाग वेगळा!
आता नोकरी आहे,पगार आहे म्हटल्यावर मुली चालून येणे स्वाभाविकच आहे.मग कुर्डूवाडीच्या लक्ष्मण पाडोळे यांच्या श्रद्धा या मुलीबरोबर त्यांचे लग्न झाले.नोकरी व संसार दोन्ही सुरु झाले.
तो काळ असा होता कि डी.एड.कॉलेजची संख्या भरमसाठ झालेली होती.आणि त्याचा परिणाम असा झाला कि डी.एड.करुन बाहेर पडलेले भावी शिक्षक बेरोजगार म्हणून पावला पावलावर दिसू लागले.शेवटी ही बेकारी एवढी वाढली की शासनाला सर्व डी.एड.कॉलेजेस बंद करावी लागली.त्यात वडशिंगेचे कॉलेजही आलेच.
झाले...रत्नदीप यांची ती नोकरीही गेली.ज्या नोकरीकडे बघून पाडोळे यांनी रत्नदीप यांना आपली मुलगी दिली होती ती नोकरी जाताच आम्हाला फसविले असा ठपका त्यांनी रत्नदीप यांच्यावर ठेवला.श्रद्धा यांचीही भूमिका यापेक्षा वेगळी नव्हती.बेरोजगारीशी लढायचे,संसार चालवायचा कि बायको व सासरच्या मंडळींना तोंड द्यायचे अशा विचित्र मनःस्थितीत
रत्नदीप सापडले.कांबळे सरांनाही हे सर्व पाहून वाईट वाटायचे.यासाठी तुझा जन्म झाला नाही असे ते वारंवार म्हणायचे.मग करायचे तरी नेमके काय करायचे या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते.सध्या तरी कुठूनही चार पैसे घरात येणे महत्त्वाचे होते.
त्यावेळी फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड नुकतेच सुरु झाले होते.ही बाब लक्षात घेऊन रत्नदीप यांनी मित्रांकडून तीस चाळीस हजारांची जुळवाजुळव करुन एक रेडियम कटिंग मशिन खरेदी केली व माढ्यात नंबर प्लेट बनवण्याचे दुकान टाकले.हा व्यवसाय मात्र जोमात चालू लागला.घर प्रपंचा चालवून बचतही मागे पडू लागली.वर्ष दीड वर्ष अगदी मजेत गेले.बचत करुन मागे ठेवलेले पैसे व श्रद्धा यांचे दोन तोळ्याचे गंठण मोडून आलेले पैसे असे दोन लाख रुपये जमा करुन त्यांनी कुर्डूवाडी येथे एक प्लॉट खरेदी केला.
पण चालत्या गाडीला वंगण करणारे खूपजण असतात.हा व्यवसाय अगदी चांगल्या रितीने सुरु असताना गावातील एकजणाने वडिलांना फितवले.रयतमध्ये कलाशिक्षकाची भरती होणार असून रत्नदीपची कला पाहून त्याला शंभर टक्के घेतील असे स्वप्न त्याने व त्याच्या बारामतीच्या मित्राने बळीराम बारबोले या इर्षेने पेटलेल्या माणसाला दाखवले.सात लाखाची बोली ठरली.
मग काय? त्या सात लाखाची भरती करण्यासाठी कुर्डूवाडीतला तो प्लॉट सहा लाखाला विकला.रेडियम मशिनही विकली.साडेसहा लाखाची भरती करुन ते त्या माणसाच्या हवाली केले.उर्वरीत पन्नास हजार नोकरी लागल्यानंतर देण्याचे ठरले.
दुकान बंद.अॉर्डर येण्याची वाट बघत दिवस ढकलणे सुरु झाले.हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे यालाच तर म्हणतात.दुकान गेले,प्लॉट गेला,पैसे गेले पण जी यायला हवी होती ती अॉर्डर कधीच आली नाही.आपण फसवलो गेलो आहोत ही जाणिव जेव्हा झाली तेव्हा खूप उशीर झालेला होता.
नैराश्य..नैराश्य..आणि फक्त नैराश्य तेवढे हाती उरले होते.आधीच्या साडेतीन लाखासाठी जमीन गेली,त्यातले दहा वीस,दहा वीस हजाराने परत आलेले दोन लाख कुठे गेले ते समजलेच नाही.या साडेसहा लाखाने सर्वस्व नेले.आता काय?
जगणे गरजेचे होते पण त्यासाठी पैसा कमवणे महत्त्वाचे होते.आणि म्हणूनच अंगभूत कला,छंद,आवड या गोष्टींना मुरड घालून पैसे कमविण्यासाठी रत्नदीप गावातच उभी राहत असलेल्या प्रकाश कुलकर्णी यांच्या गूळ फॅक्टरीत सुपरवायझर म्हणून रुजू झाले.तिथे त्यांची ओळख माढ्याचे मुन्ना साठे व कुर्डूवाडीचे उद्योगपती संजय चव्हाण यांच्याशी झाली.दोन तीन महिन्यात या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.रोजच्या बोलण्या बसण्यातून त्या दोघांनाही हे जाणवले कि रत्नदीप यांची जागा इथे नाही.त्यांना त्यांच्या क्षेत्रात उभे राहण्यासाठी जी लागेल ती मदत आपण करु असे त्या दोघांनी ठरवले.मग राज ठाकरे यांच्या अॉफिसमध्ये जे पेंटिंग आहे तसेच पेंटिंग बनवून देण्यास त्यांनी रत्नदीप यांना सांगितले.
कलाकार तो कलाकारच असतो.त्यांना जसे हवे होते अगदी तसे पेंटिंग रत्नदीप यांनी बनवून दिले.कलाकारापेक्षा कलेची कदर करणारा श्रेष्ठ असतो असे म्हणतात त्याप्रमाणे संजय चव्हाण व मुन्ना साठे यांनी रत्नदीप यांच्या कलेची कदर केली.रत्नदीप यांना त्यांनी त्या पेंटिंगचे ५० हजार रुपये दिले.बिनपगारी,दोन हजारावर व पाच हजारावर नोकरी करणाऱ्या रत्नदीप यांची हीच तर खरी किंमत होती आणि हेच तर त्यांचे खरे क्षेत्र होते.
याच ५० हजारातून त्यांनी रंग,ब्रश,कॅनव्हॉस आणि एक मोबाईल खरेदी केला व आपल्या खऱ्या आयुष्याला सुरुवात केली.
शेजारची एक लहान मुलगी गणवेश घालून शाळेला जायच्या तयारीत दरवाजाबाहेर उभी होती.त्याचवेळी रत्नदीप यांची नजर तिच्यावर गेली.तिची ती भावमुद्रा त्यांना इतकी भावली की त्यांनी तिला तसेच थांबायला सांगून झटपट एक स्केच काढले.त्यात रंग भरुन ते चित्र जेव्हा त्यांनी कांबळे सरांना दाखवले तेव्हा ते अगदी भारावून गेले व हीच तर तुझी खरी ताकद आहे असे रत्नदीप यांना सांगितले.आणि हेच त्यांचे पहिले पोट्रेट...इथून त्यांचा जो प्रवास सुरु झाला तो त्यांना जगप्रसिद्ध करुन गेला.
" तो मुकबधीर आहे,पण चित्रकलेची फार आवड...त्याचे वडील त्याला माझ्याकडे घेऊन आले.मी त्याला मार्गदर्शन करावे ही त्यांची अपेक्षा.फी देण्याची त्यांची तयारी..पण..ते माझ्या तत्त्वात बसत नव्हते.मी सर्व साहित्य पुरवून त्याला शिकवले.याच मुलाने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना त्यांचे लाईव्ह पोट्रेट केले.त्यावेळी फडणवीस यांनी त्याचा खूप मोठा सत्कार केला.एकप्रकारे तो माझ्यातल्या गुरुचाही सन्मान होता. " - रत्नदीप बारबोले
जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचे असेल तर सोशल मिडीयासारखे उत्तम माध्यम नाही.मोबाईल तर होताच पण तो हाताळता यायला हवा ना! याकामी रत्नदीप यांचे चुलतबंधू प्रकाश बारबोले ( जे सध्या सीबीआय मध्ये कार्यरत आहेत ) यांनी बहुमोल सहकार्य केले.त्यांनी रत्नदीप यांचे फेसबुक अकाउंट ओपन करुन त्यावर रत्नदीप यांची पेंटिंग्ज अपलोड करायला सुरुवात केली.हळूहळू जगभरातील अनेक दिग्गज चित्रकारांशी त्यांची फेसबुक मैत्री झाली.या क्षेत्राला असाही एक शाप आहे कि इथे कुणी कुणाला मार्गदर्शन करत नाही.पण कोरियातील प्रतिथयश चित्रकार टोनो टिपी यांना रत्नदीप यांच्या चित्रातील वेगळेपण दिसले व ते कमेंटमधून मार्गदर्शन करु लागले.हा सगळा मामला अर्थातच इंग्लिशमध्ये असायचा.शालेय शिक्षणात यथातथा असलेल्या रत्नदीप यांच्या ते डोक्यावरुन जायचे. मग रत्नदीप यांनी प्रकाश यांना हे काय म्हणत आहेत असे विचारावे..प्रकाश यांनी ते मराठीत करुन सांगावे..मग रत्नदीप यांनी मराठीत रिप्लाय सांगायचा व प्रकाश यांनी तो इंग्लिशमध्ये रुपांतरीत करुन पोस्ट करायचा.थोडक्यात प्रकाश हे दुभाष्याबरोबरच रत्नदीप व टोनो टिपी यांच्यामधला दुवा बनले.
असेच तीन चार महिने गेले आणि एक दिवस टोनो टिपी यांनी रत्नदीप यांना भारतीय संस्कृतीवर एखादे पेंटिंग बनवून ते लंडनमध्ये आयोजित केलेल्या अॉनलाईन इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पाठवायला सांगितले.रत्नदीप यांनी लगेचच शेळीचे कोकरु मांडीवर घेऊन बसलेल्या एका भारतीय स्त्रीचे पेंटिंग बनवले व ते टोनो टिपी यांना पाठवले.ते पेंटिंग पाहून टोनो टिपी इतके प्रभावित झाले कि त्यांनी लगेच ते कॉम्पिटिशनमध्ये पाठवून द्यायला सांगितले.
![]() |
| हेच ते चित्र..ज्याने रत्नदीप यांचे आयुष्य बदलले ! |
रत्नदीप यांनी ते पेंटिंग कॉम्पिटिशनमध्ये पाठवून दिले आणि जगभरातल्या असंख्य पेंटिगमधून टॉपच्या तीस पेंटिंग मध्ये रत्नदीप यांच्या पेंटिंगची निवड झाली.जागतिक स्तरावर एवढा मोठा बहुमान मिळणे ही साधी गोष्ट नव्हती.मग रत्नदीप व प्रकाश यांनी ही यशोगाथा प्रशस्तीपत्रासह फेसबुकवर अपलोड केली.ती पोस्ट कांबळे सरांच्या सोलापूरमध्ये दिलेल्या मुलीने पाहिली.तिने आपल्या पतीला ही बातमी सांगितली.त्यांनी लगेचच दै.सकाळमध्ये कार्यरत असलेले त्यांचे मित्र परशुराम कोकणे यांच्या कानावर घातली.त्यांनी सकाळमधून जवळजवळ अर्धा पान रत्नदीप यांची यशोगाथा मांडली.याचबरोबर माढ्याचे पुण्यनगरीचे पत्रकार धैर्यशील भांगे यांनीही रत्नदीप यांना उचलून धरले.आणि हाच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईन्ट ठरला.
...आणि मग जगाला आणि विशेषतः गावाला रत्नदीप यांची खरी ओळख पटली.गिधाडासारख्या टोच्या मारलेले लोकही आता आदराने बघू लागले होते.दारफळचे नाव जगाच्या नकाशावर उमटवले म्हणून गाववाल्यांनी प्रा.शिवाजीराव सावंत,रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते रत्नदीप व त्यांच्या वडिलांचा नागरी सत्कार ठेवला.
ज्या गावाने नावे ठेवली त्याच गावाने आपला सत्कार केला यापेक्षा दुसरे मोठे यश अजून काय असू शकते! याचा वडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद व समाधान होते ते रत्नदीपसाठी लंडनच्या पुरस्कारापेक्षाही मोठे होते.
नियती इतकीही क्रुर असू शकते यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही.पण रत्नदीप यांच्या आयुष्यात ज्या घटना घडत गेल्या ते पाहून नियती किती क्रुर असते हे लक्षात येईल.
" पहिला मुलगा प्रज्ज्वल वारला.त्यानंतर दुसराही मुलगाच झाला.प्रज्ज्वलची अगदी सेम टू सेम कार्बन कॉपी.वाटले,माझा प्रज्ज्वलच पुनर्जन्म घेऊन पुन्हा आला आहे.लोक नको म्हणत होते पण मी याचेही नाव प्रज्ज्वलच ठेवले.." - रत्नदीप बारबोले
पुरस्काराचा आनंद अजून चेहऱ्यावरुन ओसरतो न ओसरतो तोच रत्नदीप यांचा अडीच वर्षांचा मुलगा प्रज्ज्वल काविळीने आजारी पडला.खूप उपचार केले,कितीही खर्च करायची तयारी होती पण प्रज्ज्वल वाचू शकला नाही.बारबोले कुटूंबाला हा धक्का सहन करण्यापलिकडचा होता.नियतीने आपला क्रुरपणा पुन्हा एकदा दाखवला होता.
![]() |
| रत्नदीप,पत्नी श्रद्धा व द्वितीय प्रज्ज्वल |
मोकळे मन हे भूतांचे माहेरघर असते असे म्हणतात.नाही नाही ते विचार मनात थैमान घालतात.या विचारांना लगाम घालायचा तर मनाला कशात तरी गुंतवायला हवे.म्हणून रत्नदीप यांनी स्वतःला पेंटिंगमध्ये अक्षरशः बुडवून घेतले.दुःखाला त्यांनी आपली ताकद बनवली आणि कलेत जीव ओतला.
या कालावधीत त्यांनी अक्षरशः झपाटल्यासारखे काम करुन जवळजवळ १७-१८ कलाकृतींना जन्म दिला.आणि देश विदेशातील चित्रप्रदर्शनामध्ये आपली पेंटिंग्ज पाठवली.आतापर्यंत त्यांना शंभराहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.त्यांच्या या पेंटिंग्जना जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व मागणी येऊ लागली.५० हजारापासून साडेतीन लाखापर्यंत त्यांची पेंटिंग्ज विकली जाऊ लागली आणि सीना दारफळचा बापाला गाळात घातलेला रत्नदीप जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले झाला.
© अनिल एस.राऊत ८९९९६८९९५७
[ मागे म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रात कुणी कितीही जवळचा असला तरी मार्गदर्शन करत नाही ही बाब लक्षात घेऊन त्यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ प्रज्ज्वल आर्ट फाउंडेशनची स्थापना करुन वाटसप ग्रुपच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना मोफत मार्गदर्शन व गरजूंना मोफत साहित्य पुरवठा सुरु केला.]
[ यशाचा आलेख चढत असताना त्यांनी कोथरुडला स्टूडिओ उभा केला.दोन वर्ष तिथून काम केले.नंतर लॉकडाऊन पडले व तो स्टुडिओ गावात आणला.लॉकडाऊनमुळे पुन्हा परिस्थिती चिघळली मात्र यावर उपाय म्हणून चित्रकलेचा अॉनलाईन अभ्यासक्रम तयार केला,अॉनलाईन शिबीरे आयोजित केली व त्यामाध्यमातून उदरनिर्वाह सुरु केला. ]
नुकताच त्यांच्या " थेंब पावसाचे " या कलाकृतीला अॉल इंडिया आर्ट कॉन्टेस्ट मध्ये चौथा क्रमांक मिळाला
समाप्त


















जीवण्याच्या प्रवासात चढ उतार येतच राहतात. खूप प्रेरणा मिळाली सर वाचून
ReplyDeleteरत्नदीप या नावातच रत्न आणि दीप होय.. खूप प्रेरणादायी.. बंधू मित्र रत्नदीप यांना उज्वल भविष्यासाठी मंगल कामना
ReplyDeleteWell done rantdeep
ReplyDeleteSo inspiring...
ReplyDeleteMazhe bhagych mhnayche mala tumchysarkhe ,"guru" milale
ReplyDeleteहृदय द्रावक... सत्यकथा...
ReplyDeleteमी साक्षीदार.. तिचा..
अभिमानानं सांगतो..
असा गुरू लाभला मला....
Inspiring
ReplyDeleteVery very heart touching and inspiring life you all have or are living, it's a privilege to know you and my wishes are always with you.
ReplyDeleteजीवनाच्या प्रवासात चढउतार हे असतातच पण आज तू दारफळकरांच्या शिरपेचात मानाचातुरा रोवला आहे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूपंच खतरनाक प्रवास ..... जीवन म्हणजे तरी काय हा प्रवास शिकवतो . कितीही मोठे संकटे आली तरी पुन्हा त्याच जोमात उभं राहून परिस्थितीवर मात मिळवत आपलं स्वतंत्र अस्तित्व कसं निर्माण करायचं हे बारबोले सर यांच्या जीवन प्रवासातून समजतं .....
ReplyDeleteजीवघेण्या संकटाशी सामना करत स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेल्या'रत्नदीप बारबोले 'यांची संघर्षगाथा "अनिलजी"तुम्ही समाजासमोर आणली.
ReplyDelete