Skip to main content

फिनिक्स शेतकरी - दत्ता सुतकर

 फिनिक्स शेतकरी - दत्ता सुतकर


[ वय अवघे ३२ वर्षे..पण बऱ्या-वाईटाचा खूप अनुभव घेत,जिद्दीने आणि एका ठराविक ध्येयाने कठीण परिस्थीतीतही मनाचा तोल ढळू न देता संघर्षातून सुबत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आणि सगळे संपले आहे असे वाटत असतानाच 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे भरारी घेणाऱ्या सौंदणे ता.मोहोळ येथील दत्ता सुतकर या तरुण शेतकऱ्याची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे.मुळातच सौंदणे व आसपासचा भाग हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो.या भागावरच अनेक साखरसम्राट गबरगंड झाले.पण शेतकरी आहे तिथेच आहे.ज्याने ऊस केला नाही तो कामातून गेला अशा दृष्टीने इतर लोक ऊसपीक न घेणाऱ्या शेतकऱ्याकडे बघत असतात.मात्र दत्ता सुतकर या तरुण शेतकऱ्याने ऊसपीकाकडे पूर्णपणे पाठ फिरवून वेगळा मार्ग अवलंबला आणि त्यांची आता संघर्षातून सुबत्तेकडे वाटचाल सुरु आहे.अशा जिद्दी शेतकऱ्याची ही विस्मयकारी वाटचाल....]

   साधारण वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे २००५ सालापासून शेतीची जबाबदारी अंगावर पडलेले दत्ता सुतकर यांचे ते वय म्हणजे तसे नाकळतेच होते.त्यामुळे इतर शेतकरी करतात तशीच त्यांच्या शेतीचीही सुरुवात झाली.ऊसाची टिपरी बुडवायची,वारेमाप खर्च करायचा आणि उतार किती पडायचा तर ५०-५५ टन एकरी.आणि परतावा मिळण्यासाठी १७ महिने वाट पहायची.एकरकमी आलेला पैसा शेतकऱ्यांना दिसतो पण थोडा थोडा करत जवळपास तेवढाच पैसा ऊसपीकासाठी खर्च झालेला असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.त्यामुळे ऊसशेती ही  फायद्याचीही म्हणता येत नाही आणि तोट्याचीही म्हणता येत नाही.कारण लागवडीपासून तोडणीपर्यंतचा खर्च व कारखान्याला ऊस घालवताना ऊसतोडणी मजूरांना द्यावी लागणारी रक्कम,सरपण,चिकन,दारु,वाहनचालकाचे जेवण,त्याची एन्ट्री,ऊसमजूरांनी इतर पिकांची केलेली नासधूस असा सगळा खर्च धरला तर शेतकऱ्याच्या हातात मनस्तापाशिवाय दुसरे काय उरतेय? असा त्यांनी अगदी खोलवर विचार केला.कारखानदाराला वाहन मालकांना दिलेले लाखो रुपये वसूल करण्याशी मतलब आणि वाहन मालकाला मजूरांना दिलेले पैसे गोड बोलून वसूल करण्याशी मतलब.इथे शेतकऱ्यांना किती लुबाडले जातेय याच्याशी कुणालाच देणेघेणे नाही ही सल दत्ता सुतकर यांच्या मनाला आजही बोचते आहे.

      आणि म्हणूनच या सगळ्याचा त्यांच्या मनावर असा परिणाम झाला कि ऊसपीकाविषयी त्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला.ऊस पीक हे आळशी लोकांचे पीक म्हणून ओळखले जाते.साहजिकच ऊसाच्या टिपऱ्या बुडवल्या कि तो निवांत होतो आणि जे नको ते सुचते.त्यात संगत वाईट असेल तर त्याचे परिणाम कायम भयंकर होतात.माणूस नेहमी कामात व्यस्त असला कि त्याला इतर दुर्बुद्धी सुचत नाही असा विचार दत्ता सुतकर करतात.

       कारण ते स्वतः या परिस्थितीतून गेलेले आहेत.जो आकडा ऐकूनच समोरच्याच्या अंगावर काटा येतो अशा मोठ्या आकड्याच्या कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर होता.खूप काही करुन दाखवण्याच्या प्रयत्नात योग्य सल्ले न मिळाल्याने ते कर्जाच्या विळख्यात अडकत गेले.थोडे थोडके नव्हे..तर तब्बल २७ लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन अगदी कोवळ्या वयात हा तरुण एक एक दिवस घालवत होता.

    या कठीण काळात त्यांना  माणसांचे,नातलगांचे खरे चेहरे अनुभवता आले.

     माणसांचा एक फार मोठा गोड गैरसमज आहे कि माणसांना नातलग,नाती असतात.पण माणसांना नाती नसतात तर नाती पैशांना असतात.पैसा संपला..नाती संपतात असे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत.

     पण या कठीण काळातही त्यांनी आपले मन कधी खचू दिले नाही.आज ना उद्या आपण हे कर्ज फेडून सुखाचे आयुष्य जगू शकतो एवढा त्यांचा स्वतःवर विश्वास होता.

       अखेर या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी खूप विचार केला,खूपजणांचे सल्ले घेतले.कुणी चांगले सल्ले दिले तर कुणी वाईट.मग सारासार विचार करुन त्यांनी वाटणीला आलेल्या पाच एकरातील दोन एकर जमिन विकली.


कर्जाचे पै ना पै फेडले व गळ्याचा फास मोकळा केला.आणि मग काहीच न करता निवांत रहायचे ठरवले.कारण जेवढे कर्ज होते तेवढीच जमिनीचीही किंमत मिळाली.पुन्हा काही करावे तर त्यासाठी पैसा कुठून उभा करणार? हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता.

     निवांत रहायचे ठरवले असले तरीही आपल्या वाईटावर शंभर लोक टपलेले असले तरी इतरांचे भले करावे असे वाटणारा एकजण तरी भेटतोच या उक्तीप्रमाणे त्यांना अशीच एक व्यक्ती भेटली..ती व्यक्ती म्हणजे पंढरपूरच्या पाटील फार्मिंग टेक्नॉलॉजी अॅण्ड सोल्यूशनचे पाटील साहेब! पाटीलसाहेबांचे वैशिष्ठ्य म्हणजे शेतकऱ्याला शेतीविषयक कसलीही अडचण येऊ द्या ते थेट त्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात.त्यांनीच दत्ता सुतकर यांना निवांत राहण्यापेक्षा पीकपद्धती बदलण्याचा सल्ला दिला व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचनही दिले.


[ कोणताही नविन प्रयोग आधी स्वतः करुन पाहणारे आणि नंतर इतरांना मार्गदर्शन करणारे प्रयोगशील शेतकरी म्हणजे दत्ता सुतकर.त्यांना मी फक्त मार्ग दाखवला बाकी त्यांच्या जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी ही भरारी घेतली आहे.त्यांच्या प्रयोगशिलतेचा आणि अनुभवाचा आमच्या ग्रुपलाही आता खूप फायदा होत आहे. ]

संदीप जाधव पाटील कार्यकारी संचालक                              बनाना हाऊस,पंढरपूर  9423241403



      आणि मग पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलिंगड लागवड केली.


एकरी ३५ टन उत्पन्न काढले.खर्चाच्या दीडपट नफा तो ही दोन महिन्यात कमविला आणि त्यांना कलिंगड लागवडीची जणू चटकच लागली. त्यांनी आतापर्यंत कलिंगडाची पाच पीके घेतली.पहिल्या चार पिकात भरघोस नफा मिळाला.पाचव्या पिकात मात्र कोरोना,लॉकडाऊन,दिल्ली आंदोलन यामुळे दीड लाखाचा तोटा झाला.पण तोटा झाला म्हणून ते हताश झाले नाहीत किंवा शांतही बसले नाहीत.तर दोन एकरात कलिंगडाची नविन लागवड केलेली आहे.

    कोणत्याही क्षेत्रात एकसुरीपणा हा भविष्यात घातक ठरु शकतो असा विचार करुन यापूढे कलिंगड एके कलिंगड न करता कलिंगडाबरोबरच हवामानानुसार टोमॅटो,कांदा ही पीकेही आलटून पालटून घेण्याचा त्यांचा मानस आहे.

       याच्याही पुढे जाऊन ते अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेच्या ५०% अनुदानाच्या मदतीने तनिष्क फार्म अॅण्ड नर्सरी या नावाने एक प्रोजेक्ट सुरु करीत आहेत.लवकरच या रोपवाटिकेच्या माध्यमातून कलिंगड,टोमॅटो,मिरची,फ्लॉवर,कोबी इत्यादींच्या रोपांची विक्री ते सुरु करणार आहेत.


      दुसरे महत्त्वाचे असे कि आपल्या प्रगतशील शेतीच्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही व्हावा यासाठी ते पाटीलसाहेबांच्या बरोबरीने महाराष्ट्रातल्या विविध भागात जाऊन तेथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.युट्यूबच्या माध्यमातूनही ते शेतकऱ्यांना सहकार्य करत आहेत.शिवाय ज्यांना मार्गदर्शन हवे आहे त्यांच्यासाठी ७७९६३४५५५५ हा क्रमांकही त्यांनी उपलब्ध करुन दिलेला आहे.

      संघर्षातून सुबत्तेकडे सुरु असलेल्या त्यांच्या वाटचालीचे गमक काय? तर वाईटांच्या संगतीने कायम वाईटच होते म्हणून 


नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात रहायला हवे,विचारांची देवाण घेवाण करायला हवी,पीकपद्धतीविषयी चर्चा करायला हवी.मग कुणीही सधन शेतकरी होण्यापासून वंचित राहू शकणार नाही असे दत्ता सुतकर यांना वाटते.

या तरुण शेतकऱ्याची फिनिक्स भरारी आपणास कशी वाटली ते जरुर कळवा..

                                                          अनिल एस.राऊत                                                             8999689957

Comments

Popular posts from this blog

कामातून गेलेली केस ते आवाजाचा बादशहा - बाबासाहेब लोंढे

  कामातून गेलेली केस ते आवाजाचा बादशहा  बाबासाहेब लोंढे         डोक्यात शब्दांचे खूळ शिरले की माणसाला दुसरे काही सुचतच नाही.शब्दांसाठी काय काय करु आणि कसे करु हेच त्याच्या डोक्यात सुरु असते.अशी माणसे एका वेगळ्याच जगात आणि वेगळ्याच धुंदीत जगत असतात.व्यावहारिक दुनियेतील लोक अशा माणसांना 'कामातून गेलेली केस' याच दृष्टिकोनातून बघत असतात.अशाच एका कामातून गेलेल्या माणसाची ही कथा...      हातात वही,काखेत रेडिओ,खिशात पेन आणि सोबत पोस्टकार्डांचा गठ्ठा..एकीकडे रेडिओ सुरु तर दुसरीकडे कथा,कवितांचे सुचणे सुरु..लगेच ते वहीत उतरवले जायचे किंवा रेडिओवरचा कोणताही कार्यक्रम आवडला कि लिहीलेच आकाशवाणीला पत्र!      इकडे रेडिओच्या सुमधूर कार्यक्रमात तल्लीन झालेला बाबा आणि काडीच्या कामात मदत करत नाही म्हणून मागे सुरु असलेली बापाच्या शिव्यांची लाखोली.एक आवाज परमानंद देतोय तर दुसरा आवाज आत्म्याला डागण्या देतोय.पहिला आवाज बंद केल्याशिवाय दुसरा आवाज बंद होणार नाही हे ठरलेलेच.पण पहिला आवाज बंद केला तर जगण्यात राम वाटत नाही आणि दुसरा आवाज कानावर पडावा अशी इ...

नियतीने रडवलेला आणि कलेने हसवलेला जगप्रसिद्ध चित्रकार - रत्नदीप बारबोले

  नियतीने रडवलेला आणि कलेने हसवलेला जगप्रसिद्ध चित्रकार - रत्नदीप बारबोले [ प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात.ते गुण जेव्हा जागृत अवस्थेत येतात तेव्हा त्याची कला बनते.हीच कला कालांतराने छंद,आवड बनते आणि माणूस त्या छंदाने झपाटला जातो.त्या झपाटलेपणाला जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचा रत्नदीप बारबोले होतो.होय..योग्य मार्गदर्शनामुळेच घडलेल्या जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले यांचा हा जीवनसंघर्ष...] माढा तालुक्यातील सीना दारफळ हे एक गाव..आणि त्या गावातील बळीराम बारबोले हा अशिक्षीत पण जिद्दी माणूस! शेतीत काही नाही,नोकरीच महत्त्वाची असे त्यांचे विचार...! स्वतः अडाणी असुनही धाकट्या भावाला शिकवून नोकरी लावायची ही त्यांची जिद्द.आणि त्यासाठी त्यांनी स्वतः काबाडकष्ट करुन भावाला इंजिनियर बनवले.आता आपल्याला सुखाचे दिवस येतील असे वाटत असतानाच जे प्रत्येक घरात घडते तेच त्याही घरात घडले.हात पोहोचल्यानंतर आपल्यासाठी कुणी किती खस्ता खाल्ल्या हे माणसाला आठवत नाही.ते घरही याला अपवाद नव्हते.      असा हा दुखावलेला आणि मनात काही ठरवून पुन्हा जिद्दीला पेटलेला माणूस.पत्नी...