वास्तवदर्शी अभिनयाचा 'बाप' माणूस - शशांक शेंडे
कागर,रेडू,ख्वाडा,रिंगण,बाबांची शाळा यासारख्या अनेक चित्रपटातून जिवंत आणि वास्तवदर्शी भूमिका वठवणाऱ्या शशांक शेंडे यांना कागरमधील राजकिय नेता प्रभाकर देशमुख गुरुजींच्या व्यक्तीरेखेसाठी यंदाचा सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर संक्षिप्त प्रकाश टाकणारा हा विशेष लेख
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही आपल्या कलात्मक अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे आणि प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे अभिनेते शशांक शेडे! त्यांचे चित्रपट पाहताना आपण चित्रपट पाहतोय असे न वाटता तो प्रसंग प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर घडत आहे असे वाटावे इतका जिवंतपणा त्यांच्या अभिनयातून दिसून येतो.त्यांनी आजपर्यंत जवळ जवळ ५०-६० चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत.त्यांच्या वास्तवदर्शी अभिनयामुळे त्यांची प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहते.त्यांच्या याच वेगळेपणामुळे मकरंद माने दिग्दर्शित कागर चित्रपटातील राजकीय नेता प्रभाकर देशमुख गुरुजींच्या भूमिकेसाठी नुकताच त्यांना मराठी फिल्म फेअर अवॉर्ड २०२० चा सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.हा त्यांचा दुसरा फिल्म फेअर पुरस्कार असून याआधीही त्यांना मकरंद माने यांनीच दिग्दर्शित केलेल्या रिंगण या चित्रपटातील अर्जून मगर या व्यक्तीरेखेसाठी मराठी फिल्म फेअर अवॉर्ड २०१८ चा क्रिटीक्स सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता.
दुःख,गरीबी,हाल अपेष्टा दर्शवणाऱ्या त्यांच्या भूमिकेतील त्यांची समरसता पाहिली की असे वाटते कि खरेच या माणसाने वास्तविक आयुष्यात किती दुःख भोगले असेल! पण सुखी-संपन्न अशा कुटूंबात वाढलेल्या शशांक यांना दुःख,हाल अपेष्टा,गरीबी याची भावनिक जाण आहे हेच त्यांच्या अभिनयातून दिसून येते.
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील पूणे सोलापूर हायवेवर असलेल्या टेंभूर्णी या गावाशी शशांक यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.त्यांचे वडील महादेव हे मूळ टेंभूर्णीचे.महादेव यांना शंकर हे भाऊ व सहा बहिणी.एमएस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माळीनगर येथील मंगल बोरावके ( आज हयात नाहीत ) यांच्याशी विवाह करुन महादेव हे नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले.तिथेच शशांक यांचा जन्म झाला व बालपणही तिथेच गेले.वडिलांच्या बदलीमुळे त्यांचे काही शिक्षण अहमदनगर येथे तर काही पूणे येथे झाले.शशांक यांना राहुल व वैशाली ही दोन भावंडेही आहेत. पत्नी नीता या अॅडव्होकेट असून दासू व डेबू ही दोन जुळी मुले आहेत.वडील महादेव हे साखर संचालक पदावरुन निवृत्त झाले असून चुलते शंकर हे ही पुण्यातील एका मोठ्या दैनिकाच्या संपादकीय विभागातून निवृत्त होऊन गावाकडे निवृत्तीजीवनाचा आनंद घेत आहेत.तर चुलतबंधू अमरसिंह हे राजकिय क्षेत्रात कार्यरत असून एका राजकिय पक्षाचे जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत.
आपल्या मुलांनी खूप शिकावे आणि चांगल्या पगाराची नोकरी करावी असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते.शशांक शेंडे यांचे आईवडीलही यास अपवाद नव्हते.पण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव म्हणून शशांक यांना कॉलेज जीवनातच नाटक व अभिनयाची आवड निर्माण झाली.कोणताही कलाकार हा आपल्या कलेवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करत असतो.साहजिकच बी.एस्सी.अॅग्रीचे शिक्षण अर्धवट सोडून शशांक यांनी कलाक्षेत्राला वाहून घेतले.पं.सत्यदेव दुबे यांचेकडून अभिनयाचे धडे घेऊन त्यांनी आपले सहकारी निखील रत्नपारखी,सोनाली कुलकर्णी ( सिनीयर ),किरण यज्ञोपवित यांना सोबत घेऊन 'समन्वय' हा नाटकप्रेमींचा एक ग्रुप तयार केला.त्यानंतर समन्वयच्या माध्यमातून प्रायोगिक नाटके करायला सुरुवात केली.
रंगभूमीवरील कलाकाराला दूरदर्शन क्षेत्र व चित्रपटसृष्टी नेहमीच खुणावत असते.नाटक करता करता टी.व्ही.मालिका आणि त्यानंतर चित्रपट सृष्टी शशांक शेंडे यांना खुणावू लागली.अॉडिशनच्या माध्यमातून उपेंद्र लिमये यांच्या सोबतचा 'उरुस' हा पहिला मराठी चित्रपट त्यांना मिळाला.आणि त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीत त्यांची घोडदौड सुरु झाली.कागर,रिंगण,रेडू,ख्वाडा,उबुंटू,यंग्राड,बाबांची शाळा अशा कितीतरी चित्रपटांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.मराठीनंतर त्यांनी कमिने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीतही पदार्पण केले.कमिने नंतर फोर्स,चिल्लर पार्टी,हेट स्टोरी २,इश्किया करत करत तान्हाजी पर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे.हा प्रवास पुढेही असाच सुरु राहणार आहे.
प्रत्येक चित्रपटाची वेगळी कथा,त्यातील वेगळी व्यक्तीरेखा साकारताना लेखकाच्या व दिग्दर्शकाच्या कल्पनेतील त्या त्या पात्रांना जिवंतपणा आणताना कलाकाराच्या अंगी परकाया प्रवेशाचे विलक्षण कसब असावे लागते.ते कसब शशांक शेंडे यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहे.त्यामुळेच त्यांच्या भूमिकांमध्ये तोच तोचपणा जाणवत नाही.आणि हेच त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ठ्य आहे.त्यांच्या कोणत्याही एका भूमिकेविषयी लिहीणे म्हणजे इतर भूमिकांवर अन्याय केल्यासारखेच आहे.म्हणून त्यांच्या एकूण अभिनयाबद्दल लिहीलेले केव्हाही चांगलेच...कारण हा कलाकार वास्तवदर्शी अभिनयाचा 'बाप' माणूस आहे.
अभिनयाबरोबरच लेखनकलेतही आपण समृद्ध आहोत हे त्यांनी यंग्राड चित्रपटाची पटकथा लिहून सिद्ध केलेले आहे.सर्वसामान्य माणसाचे जगणे आपल्या भूमिकेने पडद्यावर हुबेहूब साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या कारकिर्दीचा आलेख वरचेवर असाच वाढत राहो याच शुभेच्छा!
अनिल एस.राऊत ८९९९६८९९५७ ( लेखक मराठी चित्रपट लेखक व मुक्त पत्रकार आहेत )
शशांक शेंडे यांनी अभिनय केलेले चित्रपट
हिंदी
तान्हाजी,कमिने,फोर्स,चितगाँग,हेट स्टोरी २,रज्जो,घनचक्कर,बियाँड द क्लाऊड्स,चिल्लर पार्टी,सिटी अॉफ गोल्ड,वक्रतुंड महाकाय,स्टेनली का डब्बा
मराठी
बेवफा,दिठी,अधम,कागर,लकी,यंग्राड,मस्का,लुज कंट्रोल,रेडू,बिस्कीट,हॅप्पी बर्थडे,उबुंटू,बंदूक्या,रिंगण,एक ते चार बंद,व्हँटीलेटर,हाफ तिकीट,रेती,बाबांची शाळा,ख्वाडा,हायवे,आभरान,रझाकार,भातुकली,आजोबा,देख तमाशा देख,मौनराग,कुरुक्षेत्र,तुह्या धर्म कोंचा,मसाला,विवर,हे,देऊळ,शाळा,ताऱ्यांचे बेट,आघात व लालबाग परळ
पात्रांना योग्य न्याय देणारा अभिनेता
लेखक हा एखाद्या पात्राला जन्म देतो आणि दिग्दर्शक त्या पात्राला दिशा दाखवण्याचे काम करतो.पण त्या पात्राचे पालकत्त्व हे कलाकाराकडेच असते.फिल्म फेअरसारखा मानाचा पुरस्कार मिळणे म्हणजे त्या पात्राची जडणघडण आणि त्याचे पालकत्त्व योग्य व्यक्तीच्या हातात दिल्याची ती पोच आहे असे मला वाटते.
वेगवेगळी पात्रे,वेगवेगळ्या भूमिका करत असताना शशांक सर नेहमी त्या पात्रांचा अभ्यास करुन,त्यांच्या स्वभावातील बारकावे टिपून व त्या पात्रांचे जगणे आत्मसात करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात.म्हणूनच त्यांचा अभिनय जिवंत वाटतो.
अशा कलाकाराबरोबर काम करण्याचा आनंद अलौकिक असतो.तो आनंद मी खूप वेळा घेतलेला आहे.
मकरंद माने लेखक व दिग्दर्शक कागर,रिंगण
अतिशय संवेदनशील मनाचा कलाकार
शशांक सर म्हटले कि आपल्याच घरातील कुणाचे तरी नाव उल्लेखल्यासारखे वाटते.त्यांच्या स्वभावातील आपलेपणा आणि सहजता समोरच्या कलाकारांमध्येही सहजता आणते."ख्वाडा" मध्ये त्यांच्या सोबत काम करण्याचा योग आला.अतिशय संयमी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व. ख्वाडाच्या चित्रीकरणादरम्यान एकदा एक्स्ट्रीम वाईड कॅमेरा लावलेला होता.आम्हाला सर्वांना आमचे बिऱ्हाड घेऊन टेकडीवरुन जवळपास अर्धा किलोमीटर चालत यायचे होते. शूटिंग मे महिन्यातील,वेळ दुपारी 12:30 च्या आसपासची असेल..ऊन मी म्हणत होते.अशा रणरणत्या उन्हात आम्ही सगळे पठारावरून घोड्यावरून बिऱ्हाड घेऊन चालत येत होतो.त्या शॉटचे किमान सहा ते सात रिटेक झाले असतील.कधी स्पॉटबॉय शॉटमध्ये दिसायचा तर कधी घोड्यावरून बिऱ्हाडच खाली पडायचे.तर कधी घोडे मध्येच रस्ता बदलायचे.पण प्रत्येक वेळी आम्हाला तेवढेच अंतर वर चालत जावे लागायचे.त्यावेळी सरांनी एकदाही तक्रार केलेली मला आठवत नाही.एकही रिटेक त्यांच्यामुळे झाला नव्हता.तरीदेखील ते आमच्या बरोबर अर्धा किलोमीटर पायी चालत यायचे.त्या शूटिंग दरम्यान सरांना उन्हाचे स्ट्रोक्स झाले होते. पण सर अगदी तेवढ्याच एनर्जीने शेवटपर्यंत काम करत होते. असे अनेक अनुभव आलेत.सर माझ्यासाठी एकप्रकारे अप्रत्यक्ष गुरुच म्हणता येतील.हरहुन्नरी आणि अतिशय संवेदनशील मनाचा,कलेची जाण असलेला असा हा कलाकार.
वैशाली वसंतराव केंदळे अभिनेत्री,लेखिका व दिग्दर्शिका
....आणि चांगले मित्र झालो!
“ रिंगण ” चित्रपटातील माझ्या चित्रिकरणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी सेटवर गेलो तेव्हा शशांक दादा संवाद वाचत बसलेले होते.अक्षय खाडिलकर यांनी मला शशांक दादांसमोर नेले आणि सांगितले,“ हे आहेत आजच्या सीनमधले अध्यक्ष.आता तुमचा यांच्या सोबतचा सीन लावतोय.” शशांक दादांनी त्यांच्या त्या टपोऱ्या डोळ्यांना आणखी विस्तारत अनोळखी नजरेने माझ्याकडे बघितले आणि म्हणाले,"बसा.आपण एकत्रित प्रसंग वाचन करु म्हणजे मला तुमचा अंदाज येईल.अहो,कालच्या सीनला बराच त्रास दिला समोरच्या कलाकाराने ऐन शूटच्या वेळी.पुन्हा तसा अनुभव नको "
त्यांचे ते बोलणे ऐकून खरेतर मन जरा खट्टूच झाले होते. पण आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्याची हीच संधी आहे असे ठरवून मी शशांक दादांबरोबर त्या प्रसंगाचे वाचन केले.त्यांनी ठीक आहे म्हणून डोके हलवले.प्रत्यक्ष प्रसंग शूट होताना मी जरासा दबावातच होतो.न जाणो काही चूक झाली तर बोलणी बसतील की काय असा विचार मनात सुरु झाला.शशांक दादांचे ते मोठे डोळे सतत माझ्यावर रोखल्यासारखे वाटायला लागले.विठ्ठलाची कृपा म्हणा पण बऱ्यापैकी मोठा असलेला पहिला प्रसंग अगदी सहज चित्रित झाला.शशांक दादांसह दिग्दर्शक मकरंद मानेंचा चेहरा उजळलेला दिसला.त्यानंतर शशांक दादांचे इतर सीन सुरु झाले.
दुपारी जेवणाच्या वेळी आम्ही परत एकत्र आलो.आपल्या मोठ्या डोळ्यांना आनंदाने विस्फारत शशांक दादा मला म्हणाले, “छान करताय तुम्ही,मला तुमचा आवाज खूप आवडला.गोड आहे." शशांक दादांचे हे कौतुकाचे शब्द ऐकून खूप बरे वाटले.त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो हे वेगळे सांगायला नको.
श्याम सावजी पंढरपूर
हाडाचा कलाकार
चमचमत्या या चंदेरी चित्रपट दुनियेत एक मातीतला माणूस, एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे शशांक सर..ख्वाडा चित्रपटाच्या निमित्ताने या अवलियाची ओळख झाली.. पहिल्यांदा शशांक सरांना भेटलो तेव्हा सरांना मी ओळखू शकलो नाही.कारण सरांनी चित्रपटातील राघू कऱ्हेची भूमिका साकारली होती.कथेतील पात्र इतक्या सहजरित्या,जिवंतपणे आणि सरळ साधेपणाने जगणारा हा कलाकार मला ओळखू आला नाही.गावातील एक सर्वसाधारण नागरिक असावा असे आधी मला वाटले.हीच त्यांच्या सरळ साधेपणाची ओळख!ख्वाडा चित्रपटाच्या टीमला विचारले की कलाकार कोण आहेत?मला त्यावेळेस सरांची ओळख करून दिली.त्या वेळेस मी फक्त मान हलवली.मला वाटले,असेल कुणीतरी गावातील व्यक्ती.परंतु थोड्याच वेळात मला सरांबद्दल कळले.चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सर्व टीमसोबत हसून खेळून वावरणारा हा माणूस रियल लाईफमध्ये सुध्दा सुपर हिरो आहे.
कार्यकारी निर्माता म्हणून मला सरांचे अनेक वेळा मार्गदर्शन लाभले.आजवर सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
आता या अवलिया कलाकाराला फिल्मफेअर पुरस्काराने पुरस्कृत केले आहे ही खूपच आनंदाची बाब आहे.अशा दिलदार मनाच्या हरहुन्नरी कलाकाराला माझा प्रणाम..!
मंगेश भिमराव जोंधळे कार्यकारी निर्माता






Hardik Abhinandan sir
ReplyDeleteअभिनंदन
Delete❤❤
Deleteसुंदर .. 🙏💓
ReplyDelete❤❤
DeleteCongratulation sir
ReplyDelete❤❤
Deleteएक बोलकी प्रतिक्रिया
ReplyDeleteशशांक शेंडे सरांच्या हृदयस्पर्शी अभिनयाचे काही चित्रपट मी पाहिले , ते माझ्या स्मृती पटलावर कायमचे कोरले गेले . त्यांच्या अभिनयातून नवीन कलाकारांना निश्चितच प्रेरणा मिळते . समाजातल्या लोकांना समाजाच्या वस्तवतेची जान होते . त्यांचा प्रत्येक अभिनय काळजाला भिडून जातो .
अशा अभिनयात स्वताला वाहून घेणाऱ्या शशांक सरांना मानाचा मुजरा
- रुद्राक्ष संतोष राऊत
Nice article...congratulations
ReplyDeleteThank You So Much Sir❤❤
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete